Skip to content
यिर्मयाह ५:१-६

यिर्मयाह ५:१-६

“यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.
‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”
हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.
मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.
मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.
म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options