यिर्मयाह ४:१९-३१
१९
अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! मला अत्यंत वेदना होत आहेत. अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, मी शांत राहू शकत नाही. कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.
२०
एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते; सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे. माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे, क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे.
२१
किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार?
२२
“माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”
२३
मी पृथ्वीकडे पाहिले, आणि ती निराकार आणि रिकामी होती; आणि आकाशाकडे दृष्टी केली आणि तेथील प्रकाश नाहीसा झाला होता.
२४
मी पर्वतांकडे पाहिले, ते कंपायमान झालेले होते; सर्व डोंगर डळमळत होते.
२५
मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता; आकाशातील सर्व पक्षी उडून गेलेले होते.
२६
सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती; आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे.
२७
याहवेह असे म्हणतात: “संपूर्ण भूमी उजाड होईल, तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही.
२८
यास्तव पृथ्वी शोक करेल आणि आकाशात काळोख होईल, कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”
२९
घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच आवाजाने सर्व नगरे घाबरून पळतात. काही लोक झुडूपात लपून बसतात; आणि डोंगरा-पर्वतांवर चढतात. सर्व नगरे उजाड पडली आहेत; कोणीही त्यात राहत नाही.
३०
हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.
३१
एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, ती आपले हात पसरून म्हणत आहे, “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”
Settings