यिर्मयाह ३०:१३-२४
१३
तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही, तुझ्या दुखापतीवर काहीही इलाज नाही, तुला आरोग्य प्राप्त होणार नाही.
१४
तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.
१५
तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.
१६
“ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.
१७
मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’
१८
“परंतु याहवेह असे म्हणतात: “ ‘मी तुझी धनसंपत्ती तुला परत देईन, आणि याकोबाच्या निवासावर करुणा करेन; त्याच्या भग्नावशेषांवरही नगरी पुन्हा बांधली जाईल आणि राजवाडा पुन्हा त्याच्या ठराविक जागी उभारला जाईल.
१९
तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, पण त्यात घट होऊ देणार नाही; मी त्यांना प्रतिष्ठित करेन, पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.
२०
त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील, त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील; त्यांचा छळ करणार्या सर्वांना मी शिक्षा करेन.
२१
त्यांना त्यांच्या स्वजनापैकीच राजा पुन्हा लाभेल; त्यांचा शासनकर्ता त्यांच्यामधून उभारल्या जाईल. मी त्याला माझ्या निकट आणेन आणि तो माझ्या निकट येईल, कारण माझ्या निकट येण्यासाठी त्याने स्वतःस मला समर्पित केले पाहिजे ना?’ असे याहवेह जाहीर करतात.
२२
‘तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा परमेश्वर होईन.’ ”
२३
पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल.
२४
याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसात तुला हे कळेल.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.