यशायाह ४४:१-८
१
“परंतु आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक,
२
याहवेह असे म्हणतात— ज्यांनी तुला निर्माण केले व तुला गर्भाशयात घडविले, आणि जे तुला साहाय्य करतील: याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, हे यशुरून, ज्याला मी निवडले आहे, घाबरू नको.
३
कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन, आणि शुष्क जमिनीला झरे देईन; तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन.
४
कुरणातील गवतासारखे ते उगवतील वाहत्या झऱ्याच्या काठावरील वाळुंजाच्या वृक्षासारखे ते वाढतील.
५
काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’; तर इतरजण स्वतःला याकोबाच्या नावाने संबोधतील; आणखी दुसरे आपल्या हातावर ‘याहवेहचा’ असे लिहून स्वतःचे नाव इस्राएल ठेवतील.
६
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.
७
माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, आणि पुढे काय होणार आहे होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे.
८
भिऊ नका, थरथर कापू नका. मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.”
Settings