Skip to content
उत्पत्ती २७:१८-२९

याकोब इसहाकाला फसवून आशीर्वाद मिळवतो

उत्पत्ती २७:१८-२९
१८
आपल्या वडिलाजवळ जाऊन याकोब म्हणाला, “बाबा.” तो म्हणाला, “काय माझ्या बाळा? तू कोण आहेस?”
१९
तेव्हा याकोबाने उत्तर दिले, “मी एसाव, तुमचा ज्येष्ठपुत्र आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. कृपया उठून बसा आणि तुमच्यासाठी शिकार करून आणलेले भोजन खा, म्हणजे तुम्ही मला तुमचे आशीर्वाद द्या.”
२०
त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.”
२१
मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.”
२२
तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.”
२३
त्याने त्याला ओळखले नाही, कारण त्याचे हात एसावाच्या हातांसारखे केसाळ होते. तो याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी तयार झाला,
२४
त्याने विचारले, “तू खरोखर माझा पुत्र एसावच आहेस काय?” तो म्हणाला “होय, मीच आहे.”
२५
मग इसहाक त्यास म्हणाला, “त्या शिकारीचे भोजन इकडे आण. मी ते खाईन आणि माझे आशीर्वाद तुला देईन.” तेव्हा याकोबाने जेवणाचे ताट आणले, तो जेवला आणि मग द्राक्षारस त्याच्याकडे आणले, तेही तो प्याला.
२६
मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.”
२७
तो आपल्या पित्याजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. जेव्हा इसहाकाला त्याच्या वस्त्रांचा वास आला, तेव्हा त्याला आशीर्वाद देत तो म्हणाला, “अहा, माझ्या पुत्राचा सुगंध, जसा याहवेहने आशीर्वादित केलेल्या शेताचा.
२८
परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.
२९
राष्ट्रे तुझी सेवा करोत, आणि लोक तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options