Skip to content
उत्पत्ती २७:३०-४०

उत्पत्ती २७:३०-४०

३०
इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला
३१
त्यानेही आपल्या पित्यासाठी रुचकर भोजन तयार केले आणि त्याच्याकडे ते घेऊन आला व म्हणाला, “बाबा, हे पाहा मी शिकार घेऊन आलो आहे. उठून बसा आणि हे खा म्हणजे मला तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ शकाल.”
३२
हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.”
३३
त्याचवेळी इसहाकाच्या शरीराला भयंकर कंप सुटला आणि तो म्हणाला, “तर मग आताच शिकार घेऊन माझ्याकडे आला होता तो कोण होता? तू येण्यापूर्वी मी तर ते खाल्ले आणि माझे आशीर्वादही त्याला दिले. होय, त्याला ते आशीर्वाद आता मिळणारच.”
३४
जेव्हा एसावाने आपल्या पित्याचे हे शब्द ऐकले, तेव्हा तो अतिदुःखाने हंबरडा फोडून आपल्या पित्यास म्हणाला, “बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या.”
३५
परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.”
३६
यावर एसावाने म्हटले, “त्याचे नाव याकोब योग्यच नाही काय? त्याने दुसर्‍यांदा मला फसविले आहे. त्याने माझा जन्मसिध्द हक्क घेतला आणि आता माझा आशीर्वादही चोरला आहे.” नंतर त्याने विचारले, “माझ्यासाठी तुम्ही एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
३७
परंतु इसहाकाने एसावास उत्तर दिले, “मी त्याला तुझा धनी आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना त्याचे नोकर करून ठेवले आहे. मी त्याला भरपूर धान्य आणि द्राक्षारस यांची हमी दिली आहे. आता देण्याचे काय शिल्लक राहिले आहे, माझ्या मुला?”
३८
एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला.
३९
त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले, “तुझे वास्तव्य सुपीक प्रदेशापासून दूर आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल.
४०
तलवारीच्या जोरावर तू जगशील तू आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू तू तुझ्यावरून झुगारून देशील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options