उत्पत्ती २४:३४-४८
३४
तेव्हा तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे.
३५
याहवेहने माझ्या धन्याला फार आशीर्वाद दिले आहेत आणि तो थोर पुरुष झाला आहे. त्यांनी त्याला मेंढरांचे कळप, गुरांची खिल्लारे, सोने चांदी, पुष्कळ दास आणि दासी, उंट आणि गाढवे दिली आहेत.
३६
माझ्या धन्याला त्याची पत्नी साराह हिच्यापासून वृद्धापकाळात एक पुत्र झाला. माझ्या धन्याने त्याचे सर्वस्व त्याला दिले आहे.
३७
त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे.
३८
माझ्या वडिलांच्या कुटुंबात जावे आणि माझ्या स्वतःच्या घराण्यातील लोकांकडे जाऊन माझ्या मुलासाठी येथील मुलगी निवडून मी आणावी, असे त्याने मला बजावले आहे.
३९
“मग मी माझ्या धन्यास विचारले, ती मुलगी माझ्याबरोबर परत आली नाही तर?
४०
“यावर त्याने उत्तर दिले, ‘ती खात्रीने येईल, कारण ज्या याहवेहच्या समक्षतेत मी चालतो ते त्यांचा दूत तुझ्याबरोबर पाठवतील आणि तुझी यात्रा सिद्धीस नेतील. माझ्या नातेवाईकांकडे जाऊन माझ्या वडिलाच्या घराण्यातील एक मुलगी शोधून आण.
४१
याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’
४२
“आज मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी अशी प्रार्थना केली की, माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेह, कृपया माझी यात्रा तुम्ही यशस्वी करा.
४३
पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा असताना पाणी भरण्यास आलेल्या एखाद्या मुलीला म्हणेन, ‘तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला प्यावयास दे,’
४४
आणि यावर ती मला म्हणेल, ‘अवश्य महाराज, आणि मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजीन,’ तीच मुलगी माझ्या धन्याच्या पुत्राची पत्नी होण्यासाठी याहवेहने निवडलेली आहे असे होऊ द्या.
४५
“माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’
४६
“मला पाणी पिता यावे म्हणून तिने आपल्या खांद्यावरील घागर झटकन खाली उतरविली आणि ती मला म्हणाली, ‘अवश्य महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.’ मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.
४७
“मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ “ती म्हणाली, ‘मी नाहोराचे पुत्र बेथुएलाची, ज्यांची माता मिल्का आहे, त्यांची कन्या आहे.’ “हे ऐकून मी तिच्या नाकात नथ आणि हातात पाटल्या घातल्या.
४८
माझ्या धन्याच्या भावाची नात शोधून काढण्यास मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे मस्तक लवविले आणि माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहचे मी स्तवन केले.
Settings