उत्पत्ती १९:१५-२२
१५
पहाट होताच, दूत लोटाला आग्रह करीत म्हणाले, “त्वरा कर! तुझी पत्नी व तुझ्या दोन कन्या ज्या इथे आहेत त्यांना घेऊन नीघ, नाहीतर या नगराचा नाश होत असताना तुझाही नाश होईल.”
१६
पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती.
१७
दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!”
१८
यावर लोट विनवणी करीत म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून असे करू नका!
१९
तुम्ही तुमच्या सेवकाशी इतके दयाळूपणाने वागला आहात व तुम्ही माझा जीव वाचविला आहे. परंतु मला डोंगरावर पाठवू नका; तिथे कदाचित माझ्यावर काही अरिष्ट येईल आणि मी मरेन.
२०
पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.”
२१
तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही.
२२
पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर नगरी असे पडले.)
Settings