Skip to content
2 राजे २५:१-११

2 राजे २५:१-११

म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर आक्रमण केले व त्याच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.
सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.
चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.
तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही त्यांनी रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या दिशेने पळ काढला,
परंतु बाबेलच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि सिद्कीयाह राजाला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते,
आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.
त्यांनी सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या पुत्रांचा वध केला. मग त्यांनी त्याचे डोळे काढले व त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.
त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली.
१०
रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटबंदी पाडून टाकली.
११
नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने शहराच्या विध्वंसातून वाचलेल्या आणि बाबेलच्या राजाला शरण गेलेल्या लोकांना बंदिवासात नेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options