Skip to content
2 राजे १०:१५-२७

2 राजे १०:१५-२७

१५
तो तिथून निघाला आणि त्याची भेट रेखाबाचा पुत्र यहोनादाबासोबत झाली, जो त्यालाच भेटावयाला येत होता. येहूने त्याला अभिवादन केले आणि म्हणाला, “जसा मी तुझ्या सहमत आहे, तसा तूही माझ्याशी सहमत आहेस काय?” यहोनादाबाने उत्तर दिले, “होय निश्चित!” तेव्हा येहू म्हणाला, “तर मग आपला हात मला दे.” आणि त्याने तसेच केले, आणि येहूने त्याला आपल्या रथामध्ये घेण्यास मदत केली.
१६
येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला.
१७
जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला.
१८
नंतर येहूने सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना म्हणाला, “अहाबाने बआलची थोडी सेवा केली; येहू त्याच्याहून अधिक सेवा करेल.
१९
म्हणून बआल दैवताच्या सर्व संदेष्ट्यांना आणि सर्व सेवकांना आणि सर्व याजकांना एकत्र बोलवा. कोणीही अनुपस्थित राहू नये याची खबरदारी घ्या, कारण मी बआलसाठी मोठा यज्ञ करणार आहे. जो कोणी येणार नाही त्याला ठार मारण्यात येईल.” परंतु बआलच्या सर्व भक्तांचा संहार करण्याच्या हेतूनेच येहूने ही योजना आखली होती.
२०
येहूने म्हटले, “बआलच्या आदरासाठी सभा बोलवा.” अशी त्यांनी त्याची घोषणा केली.
२१
नंतर येहूने सर्व इस्राएलात संदेश पाठविला आणि बआलचे सर्व सेवक आले; कोणीही मागे राहिला नाही. ते बआलचे मंदिर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरेपर्यंत गर्दी करत राहिले.
२२
आणि येहूने वस्त्र भांडाराच्या प्रमुखाला म्हटले, “बआलच्या सर्व सेवकांसाठी झगे घेऊन ये.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी झगे आणले.
२३
यानंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब मंदिरात गेले. येहू बआलच्या सेवकांना म्हणाला, “सभोवती दृष्टी टाका आणि पाहा की याहवेहची सेवा करणारा कोणीही तुमच्याबरोबर नाही—फक्त बआलचे सेवक आहेत.”
२४
म्हणून ते यज्ञार्पण व होमार्पण करण्यास आत गेले. आता येहूने ऐंशी माणसांना बाहेर ही ताकीद देऊन उभे केले होते: “जी माणसे तुमच्या तावडीत दिलेली आहेत, त्यातून एकही निसटून जायला नको, जर एकही तुमच्या तावडीतून निसटला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत मोजावी लागेल.”
२५
येहूने होमार्पण करण्याचे संपविले त्याने ताबडतोब आपल्या पहारेकरी व अधिकाऱ्यांना आदेश दिला: “आता नगरात जा आणि त्यांना मारा; कोणीही निसटून जाऊ नये.” मग त्यांनी त्या सर्वांना तलवारीने मारले. पहारेकरी व अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर फेकले आणि नंतर ते बआलच्या मंदिराच्या गाभार्‍यात गेले.
२६
बआलच्या मंदिरातून पवित्र स्तंभ बाहेर काढला आणि तो जाळून टाकला.
२७
त्यांनी बआलचा पवित्र स्तंभ नष्ट केला आणि बआलच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्याचे सार्वजनिक शौचालय असा लोक आजही उपयोग करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options