Skip to content
2 इतिहास २:१-८

2 इतिहास २:१-८

शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली.
या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.
शलोमोनाने सोरचा राजा हीराम याच्याकडे हा निरोप पाठविला: “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे.
आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.
“मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत.
परंतु ज्यांना स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्ग सुद्धा अपुरा आहे, त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास कोण समर्थ आहे? तर मग मंदिर बांधणारा मी कोण? केवळ त्यांच्या पुढे अर्पणे करण्यासाठी स्थान मी बांधत आहे.
“म्हणून या कामासाठी सोने, चांदी, कास्य व लोखंड या कामात एक कुशल व हुशार कारागीर, जांभळ्या, किरमिजी व निळ्या रंगांचे कापड विणण्यात आणि उत्तम नक्षीचे कोरीव काम करण्यात तरबेज कारागीर माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ यहूदीयात व यरुशलेममध्ये, माझे पिता दावीदाने निवडलेले जे निपुण कारागीर आहेत, त्यांच्याबरोबर तो काम करेल.
“याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options