1 राजे २२:६-१८
६
तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” ते म्हणाले, “जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देतील.”
७
परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”
८
इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”
९
तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.”
१०
इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते.
११
तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ”
१२
इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो, कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.”
१३
जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”
१४
पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”
१५
तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?” त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण याहवेह ते राजाच्या हाती देईल.”
१६
राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”
१७
तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ”
१८
इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
Settings