Skip to content
1 राजे १९:१-१४

1 राजे १९:१-१४

१
एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले.
२
तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”
३
एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले,
४
तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.”
५
नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला. अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.”
६
त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्‍यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला.
७
याहवेहचा दूत परत दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.”
८
तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला.
९
तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला. आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”
१०
एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
११
याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्‍याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्‍यात नव्हते. त्या वार्‍यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते.
१२
भूमिकंपानंतर अग्नी आला, परंतु त्या अग्नीतही याहवेह नव्हते. आणि त्या अग्नीनंतर एक शांत वाणी झाली.
१३
जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”
१४
एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मलाही मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options