Skip to content
1 राजे १०:१-१३

शबाची राणी शलमोनाला भेटते

1 राजे १०:१-१३
जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली.
मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.
शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही राजासाठी कठीण नव्हते.
जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला,
त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे झगे, त्याचे प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेले होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.
ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे.
परंतु मी येथे येऊन या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत त्यावर मी विश्वास ठेवला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे.
तुमचे लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील!
याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.”
१०
आणि तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला इतकी सुगंधी द्रव्ये आणली की त्यानंतर तेवढी द्रव्ये परत कोणी आणली नाहीत.
११
(त्याचप्रमाणे हीरामच्या गलबतांवर ओफीर येथून सोने व मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड व मोलवान रत्ने आणली.
१२
शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)
१३
शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, त्या शिवाय राजाच्या खजिन्यातूनही राजाने तिला भेटी दिल्या. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options