1 करिंथकरांस ३:१-९
१
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आत्म्याद्वारे जीवन जगत असलेल्या लोकांबरोबर बोलावे तसे मी तुमच्याबरोबर बोलू शकलो नाही, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये लहान बालक असून अजूनही दैहिक आहात.
२
मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही.
३
तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही?
४
तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
५
तर मग काय, अपुल्लोस तरी कोण आहे? मी पौल कोण आहे? आम्ही तर केवळ परमेश्वराचे सेवक, त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला—प्रभूने प्रत्येकाला कामगिरी सोपवून दिली होती.
६
मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले.
७
पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.
८
जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल.
९
आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.
Settings