स्तोत्रसंहिता१४१
Listen to this chapter
0:00
0:00
आवाहन व यज्ञ म्हणून प्रार्थना
१
दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या, जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.
२
तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो; माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.
मुख व हृदयाचे रक्षण
३
हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा; माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.
४
माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका, पातक्यांच्या सहवासात राहून, कुकृत्यामध्ये सामील होण्यापासून मला दूर ठेवा; त्यांची मिष्टान्ने खाण्यापासून मला अलिप्त ठेवा.
नीतिमान ताडनेचे मोल
५
नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल; त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते. माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही, दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.
६
दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल; तेव्हा त्यांच्या हितासाठी असलेल्या माझ्या वक्तव्याचे त्यांना स्मरण होईल.
७
ते म्हणतील, “नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात, तशी आमची हाडे अधोलोकाच्या मुखावर विखुरली गेली आहेत.”
अंतिम सुटकेसाठी विनवणी
८
परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे; तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.
९
दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा, त्यांनी टाकलेल्या पाशापासून मला सोडवा.
१०
दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे, आणि मी मात्र सुखरुपपणे निसटून जाईन.
Settings
Reading style
Typeface
Font size px
Reading width chars
Options
Study note