Skip to content
प्रकटीकरण ९:१-१२

प्रकटीकरण ९:१-१२

मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्‍याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले.
तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले.
मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्‍या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते.
पृथ्वीवरील गवत, वनस्पती किंवा झाडेझुडूपे, यांना उपद्रव न करता ज्या लोकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही, त्यांच्यावर हल्ला करण्यास सांगण्यात आले होते.
त्यांना ठार मारण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे काम सोपविले होते. विंचू मनुष्याला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणार्‍या पीडेसारखी ती होती.
त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल.
पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते.
त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.
त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता.
१०
त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्‍या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती.
११
अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे.
१२
एक अनर्थ आता संपला आहे; पण आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options