प्रकटीकरण १४:६-११
६
नंतर मी अंतराळाच्या मध्यभागी दुसरा एक देवदूत उडतांना पाहिला. पृथ्वीवर राहणार्या सर्वांना, म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोकांना सांगण्यासाठी तो सर्वकालची शुभवार्ता घेऊन चालला होता.
७
तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.”
८
तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.”
९
मग त्यांच्यामागून एक तिसरा देवदूत मोठ्याने घोषणा करीत आला: “समुद्रातील पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला जो कोणी नमन करेल आणि त्याचे चिन्ह आपल्या कपाळावर किंवा हातावर गोंदून घेईल,
१०
त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल.
११
त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली.
Settings