मुख्य मजकुरावर जा
गणना २४:१-९

बलामचे चौथे संदेशवचन: इस्राएलची समृद्धी

गणना २४:१-९
आता जेव्हा बलामाने पाहिले की इस्राएलास आशीर्वाद देण्यास याहवेहला बरे वाटले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे मंत्रतंत्र करावयाला गेला नाही, तर त्याने रानाकडे आपले तोंड वळविले.
जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला
आणि त्याने आपला संदेश सांगितला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,
जो याहवेहचा शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी, जो सर्वसमर्थाकडून दृष्टान्त पाहतो, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत:
“हे याकोबा, तुझे तंबू, हे इस्राएला, तुझी राहण्याची ठिकाणे किती सुंदर आहेत!
“ते खोर्‍याप्रमाणे पसरतात, नदीकिनारी असलेल्या बागेप्रमाणे, याहवेहने रोपलेल्या जटामांसीसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.
त्यांच्या पोहर्‍यातून पाणी वाहेल; त्यांच्या बिजांना भरपूर पाणी मिळेल. “त्यांचा राजा अगाग राजापेक्षा महान असेल; त्यांचे राज्य गौरवित केले जाईल.
“परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले; रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांचा ते नाश करतात आणि त्यांच्या हाडांचे ते तुकडे करतात; ते आपल्या बाणांनी त्यांना भोसकतात.
सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात, सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार? “जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options