मार्क ८:१-१९
१
त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले,
२
“मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही.
३
मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.”
४
शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?”
५
येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”
६
त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले.
७
त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले.
८
लोक जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या.
९
तिथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर,
१०
येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले.
११
तिथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले.
१२
हे ऐकून त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि म्हणाले, “ही पिढी चिन्ह का मागते? खरोखर या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.”
१३
नंतर ते त्यांना सोडून निघून गेले व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले.
१४
शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती.
१५
“सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.”
१६
ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील.
१७
परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का?
१८
तुम्हाला डोळे आहेत तरी पाहू शकत नाही आणि कान आहे पण ऐकू येत नाही का? तुम्हाला आठवत नाही का?
१९
पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “बारा” त्यांनी उत्तर दिले.
Settings