विलापगीत ४:१-१०
१
सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत.
२
सुवर्णतुल्य असलेल्या, सीयोनाच्या लेकरांना, आता कुंभाराच्या हातांनी घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे!
३
कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत.
४
तहानेमुळे शिशूंच्या जिभा टाळूला चिकटल्या आहेत; भाकरीसाठी लेकरे याचना करीत आहेत, पण त्यांना कोणीही देत नाही.
५
उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत.
६
माझ्या लोकांची शिक्षा सदोमापेक्षाही घोर झाली आहे, ज्यांना इतर कोणी मदत करण्याआधी त्यांचा एका क्षणात नायनाट झाला.
७
त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.
८
पण आता ते चेहरे काजळीपेक्षा काळेकुट्ट झाले आहेत; त्यांना वाटेत कोणी ओळखू शकत नाही. त्यांची कातडी हाडांना चिकटली आहे; ती काठीसारखी शुष्क झाली आहे.
९
उपासमारीने हळूहळू मरण्यापेक्षा तलवारीने मरणारे फार बरे; कारण शेतातील उपज नसल्यामुळे भुकेपायी व्याकूळ होऊन ते क्षय पावतात.
१०
करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने आपलीच मुले-बाळे शिजविली, जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला, ती त्यांचे अन्न बनली.
Settings