विलापगीत २:११-२०
११
माझे डोळे आता रडून थकले आहेत, मला आतून उत्कट यातना होत आहेत; माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, कारण लहान मुले व तान्ही बाळे नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत.
१२
ते त्यांच्या मातांना विचारत आहेत, “द्राक्षारस व धान्य कुठे आहे?” ते नगराच्या रस्त्यांवर घायाळ झालेल्याप्रमाणे बेशुद्ध होऊन पडत आहेत, त्यांच्या मातांच्या बाहूत या मुलांचे प्राण हळूहळू निघून जात आहेत.
१३
हे यरुशलेमकन्ये, सर्व जगात असले दुःख मी तुला काय म्हणू? मी तुझी तुलना कशाशी करू? मी तुला कोणा समान लेखू? जेणेकरून मी तुझे सांत्वन करू शकेन? हे सीयोनच्या कुमारी कन्ये? तुझा घाव सागराएवढा खोल आहे. तुला कोण बरे करू शकेल?
१४
तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त खोटे व व्यर्थ होते; तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. त्यांनी तुला दिलेले संदेश खोटे व दिशाभूल करणारे होते.
१५
वाटेने जाणारे सर्व वाटसरू तुझी स्थिती बघून टाळ्या वाजवित होते; यरुशलेमकन्ये. तुझा उपहास करून डोकी हालवून ते म्हणतात, “सौंदर्याची परिपूर्णता, संपूर्ण पृथ्वीचा आनंद असे संबोधली जाणारी नगरी ती हीच आहे का?”
१६
तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध त्यांचे मुख मोठे रुंद उघडले आहे; दात खाऊन रागाने फुत्कार टाकीत ते म्हणतात, “आपण अखेरीस तिला गिळंकृत केले. या दिवसाची आम्ही किती वाट पाहत होतो; ते बघण्यास आपण जिवंत आहोत.”
१७
याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.
१८
लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत.
१९
उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.
२०
याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?
Settings