यहोशुआ ८:३-१७
३
तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले,
४
त्यांना आज्ञा दिली: “लक्षपूर्वक ऐका. शहराच्या मागील बाजूस तुम्ही दबा धरून बसावे. त्या ठिकाणापासून फार दूर जाऊ नका. तुम्ही सर्वजण सावध असा.
५
मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्वजण या नगरावर हल्ला करतील आणि जेव्हा त्यांनी आधी केल्याप्रमाणे ती माणसे बाहेर आमच्यावर चालून येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ.
६
जोपर्यंत आम्ही त्यांना फसवून शहरापासून दूर घेऊन जाऊ, ते आमचा पाठलाग करतील. कारण ते म्हणतील, ‘आधी केले तसेच ते आमच्यापासून पळून जात आहेत.’ जेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ,
७
तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील.
८
जेव्हा ते शहर तुम्ही हाती घ्याल, तेव्हा याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे तुम्ही त्या शहरास आग लावून द्यावी. लक्षात घ्या; तुम्हाला मी आज्ञा दिलेल्या आहेत.”
९
नंतर यहोशुआने त्यांना पाठवून दिले आणि ते आयच्या पश्चिमेकडे बेथेल आणि आयच्यामध्ये दबा धरून बसण्याच्या ठिकाणाकडे गेले आणि वाट पहात राहिले; परंतु यहोशुआने ती रात्र लोकांबरोबर घालविली.
१०
दुसर्या दिवशी पहाटेच यहोशुआने त्याच्या सैन्याला जमविले आणि तो आणि इस्राएलचे पुढारी त्यांच्यापुढे आयच्या दिशेने चालत निघाले.
११
संपूर्ण सैन्यदल जे त्याच्याबरोबर होते ते निघाले आणि शहरापर्यंत पोहोचले आणि त्या शहरासमोर आले. त्यांनी आयच्या उत्तरेकडे छावणी उभी केली त्यांच्यामध्ये आणि आय शहराच्यामध्ये खोरे होते.
१२
यहोशुआने त्याच्याबरोबर सुमारे पाच हजार पुरुष घेतले आणि त्यांना बेथेल आणि आय शहराच्यामध्ये पश्चिमेकडे दबा धरून बसविले होते.
१३
मुख्य छावणी शहराच्या उत्तरेकडे व दबा धरून बसलेले पश्चिमेकडे, याप्रमाणे सैन्याने आपआपले स्थान घेतले. त्या रात्री यहोशुआ खोर्यात गेला.
१४
जेव्हा आय शहराच्या राजाने हे पाहिले, तेव्हा तो आणि त्या शहराचे सर्व पुरुष पहाटेस घाई करून अराबासमोर एका विशिष्ट ठिकाणी इस्राएलशी युद्ध करण्यास निघाले. परंतु त्याला माहीत नव्हते की शहराच्या मागील बाजूस शत्रुसैन्य दबा धरून बसले आहे.
१५
नंतर यहोशुआ आणि सर्व इस्राएली सैन्याने त्यांना मागे येऊ दिले आणि त्यांच्यापुढे ते रानाच्या दिशेने पळाले.
१६
आय शहरातील सर्व पुरुषांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी बोलाविण्यात आले. ते यहोशुआचा पाठलाग करीत शहरापासून लांब गेले.
१७
इस्राएली लोकांच्या मागे गेला नाही असा एकही पुरुष आय शहरात किंवा बेथेल येथे मागे राहिला नाही. त्यांनी आय शहराच्या वेशी उघड्याच टाकल्या आणि इस्राएलचा पाठलाग करण्यास गेले.
Settings