इय्योब ९:१-१२
१
मग इय्योबाने उत्तर दिले,
२
“खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो. परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल?
३
त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले, तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही.
४
त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?
५
ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात, आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात.
६
ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात.
७
ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; ते तार्यांचा प्रकाश मुद्रित करतात.
८
तेच एकटे आकाश ताणून पसरवितात आणि समुद्राच्या लाटांवरून चालतात.
९
सप्तर्षी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत.
१०
आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये; आणि मोजता येत नाहीत असे चमत्कार ते करतात.
११
ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही; ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही.
१२
जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार?
Settings