यिर्मयाह ४८:१४-२८
१४
“ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?
१५
परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत; तिच्या अत्यंत उमद्या तरुणांची कत्तल होईल,” असे राजाधिराज, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे ते म्हणतात.
१६
“मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे; तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे.
१७
तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा, तिची किर्ती माहीत असणारे सर्व सामील व्हा; म्हणा, ‘तिचा बलशाली राजदंड कसा मोडला, इतकी वैभवशाली काठी कशी मोडली!’
१८
“अहो दिबोन कन्येचे निवासी, आपल्या वैभवावरून खाली उतरा आणि शुष्क भूमीवर येऊन बसा, कारण जे मोआब भूमीचा विनाशक तुमच्याविरुद्ध येत आहेत आणि ते तिच्या सर्व तटबंदीची नगरे नष्ट करतील.
१९
अरोएरवासी जनहो, तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, आणि पळ काढणार्या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, ‘तिथे काय घडले?’
२०
मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. रडा व आकांत करा! आर्णोनच्या काठी घोषणा करा मोआब नष्ट झाले आहे.
२१
पठारे—होलोन, याहसाह, मेफाथ यांनाही शिक्षा मिळाली आहे.
२२
दिबोन, नबो, बेथ‑दिबलाथाईम,
२३
किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन
२४
करीयोथ, बस्रा— मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे.
२५
मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे. तिचे बाहू मोडले आहेत.” असे याहवेह जाहीर करतात.
२६
“तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे, कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे. मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे; तिला उपहासाचा विषय होऊ दे.
२७
इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का? ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का, कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो, घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का?
२८
मोआबभूमीच्या रहिवाशांनो आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा. गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या पारव्याप्रमाणे व्हा.
Settings