राजा यहोयाकीमाचा निषेध
१३
“धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो, अन्यायाने माळे बांधतो, त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो, आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही.
१४
तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन, ज्यामध्ये वरच्या मजल्यावर मोठमोठ्या खोल्या असतील.’ तो त्याला अनेक मोठ्या खिडक्या बांधतो, गंधसरूची तक्तपोशी करतो आणि सुंदर लाल रंगाने सजवितो.
१५
“तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर ते तुला राजा बनविल काय? तुझा पिता खातपीत नव्हता काय? त्याने जे योग्य आणि न्याय्य केले, म्हणून त्याचे सर्व चांगलेच झाले.
१६
त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात.
१७
“परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण केवळ अनीतीने धन कसे मिळवावे, निर्दोष्यांचे रक्त कसे वाहवे, आणि जुलूम व अन्यायाने कसे बळकावे याचाच शोध घेत असतात.”
१८
म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’
१९
त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल— त्याला सिंहासनावरून फरफटत आणून यरुशलेमच्या द्वाराबाहेर फेकतील!”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.