Skip to content
यिर्मयाह २:२०-२८

यिर्मयाह २:२०-२८

२०
“फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले व मी बांधलेले दावे तोडून टाकले; तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’ अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर, आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात.
२१
मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते. मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात भ्रष्ट व रानटी लता का झालात?
२२
तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.
२३
“तुम्हाला कसे म्हणता येईल ‘मी अशुद्ध नाही; मी बआल दैवताच्या मागे गेलो नाही’? दरीत जाऊन तुम्ही कसे वागले ते पाहा, तुमच्या आचरणाबद्धल विचार करा. इकडे तिकडे पळणार्‍या चपळ उंटिणीसारखे तुम्ही आहात.
२४
वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; संभोगासमयी त्यांना ती सापडेल.
२५
तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’
२६
“चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.
२७
लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’ आणि पाषाणाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे, पण त्यांचे मुख नव्हे; परंतु संकट समय येताच ते माझा धावा करून म्हणतात, ‘या आणि आमचे रक्षण करा!’
२८
तुम्ही स्वतःसाठी निर्माण केलेली दैवते कुठे आहेत? जर ते तुमचे रक्षण करू शकतील, तर त्यांनी यावे तुमच्या संकटसमयी यावे! तुम्ही यहूदीया, तुमच्या दैवतांची संख्या इतकी आहे जेवढी नगरे तुमच्या प्रांतात आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options