यशायाह ५:१-१५
१
माझी ज्यांच्यावर प्रीती आहे त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन: सुपीक डोंगराळ भागावर माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता.
२
त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.
३
“आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा.
४
माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?
५
आता मी तुम्हाला सांगेन, मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: मी त्याचे कुंपण काढून टाकेन, आणि त्याचा नाश होईल; मी त्याची भिंत पाडेन, आणि ते तुडविले जाईल.
६
मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”
७
इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.
८
तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.
९
माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे: “मोठमोठी घरे निश्चितच निर्जन होतील, उत्तम महालांमध्ये कोणी रहिवासी नसेल.
१०
दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल; एक होमेर बियाणे फक्त एक एफा धान्याचे पीक देईल.”
११
जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!
१२
त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.
१३
म्हणून असमजंसपणामुळे माझे लोक बंदिवासात नेले जातील; उच्च पदावरील लोक भुकेने मरतील आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.
१४
म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो, त्याचे तोंड मोठे करून उघडतो. त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह, त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील.
१५
म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings