यशायाह ४३:१-१२
१
परंतु आता, याहवेह असे म्हणतात— याकोबा, ज्यांनी तुला निर्माण केले, इस्राएला, ज्यांनी तुझी रचना केली: “भिऊ नको, कारण खंडणी भरून मी तुझी सुटका केली आहे. मी तुला नावाने हाक मारली आहे; तू माझीच आहेस.
२
जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.
३
कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता; तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले, तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले,
४
कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस, आणि मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्या मोबदल्यात लोकांना देईन, तुझ्या जिवाच्या मोबदल्यात मी राष्ट्रांना देईन.
५
भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मीच तुझ्या संततीला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून एकत्र करेन,
६
मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’ आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’ माझ्या पुत्रांना दूरवरून आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या—
७
जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो, ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.”
८
जे डोळे असून अंध आहेत, जे कान असून बहिरे आहेत, अशांना बाहेर काढ.
९
सर्व राष्ट्रे एकत्र येतात आणि सर्व लोक एकजूट होतात. त्यांच्या कोणत्या मूर्तींनी हे भाकीत केले होते आणि भावी गोष्टी आम्हाला घोषित केल्या? त्या सत्य बोलल्या तर त्याचे साक्षीदार त्यांनी आणावे, जेणेकरून ऐकणारे म्हणतील, “हे न्याय्य आहे.”
१०
परंतु याहवेह घोषित करतात, “हे इस्राएला, तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि तुम्ही माझे निवडलेले सेवक आहात. जेणेकरून तुम्ही ओळखावे आणि माझ्यावर विश्वास ठेवावा, मीच परमेश्वर आहे हे समजून घ्यावे. माझ्यापूर्वी दुसरा कोणी देव अस्तित्वात नव्हता, आणि माझ्या नंतरही नसेल.
११
मी, केवळ मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही.
१२
मी प्रगट केले, वाचविले व घोषित केले— मीच केले, तुमच्यातील इतर कोणत्याही विदेशी दैवताने केले नाही.” याहवेह घोषित करतात, तुम्ही माझे साक्षीदार आहात की, “मीच परमेश्वर आहे.
Settings