यशायाह ३२:१-८
१
पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.
२
प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.
३
तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत, आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील.
४
भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल.
५
यापुढे मूर्खांना चांगले व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही.
६
मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात, त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते: ते देवहीनतेची कृत्ये करतात आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात; भुकेल्यांना ते उपाशी सोडतात आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात.
७
बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात, गरजवंताची याचना वाजवी असली तरी, ते दुष्टाईच्या योजना बनवितात, ते लबाडीने गरिबांचा नाश करतात.
८
परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो.
Settings