यशायाह ३:१-१२
१
आता बघा, प्रभू सर्वसमर्थ याहवेह यरुशलेम व यहूदीयाचा अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत— सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा,
२
वीर योद्धे तथा सैनिक, न्यायाधीश आणि संदेष्टे, दैवप्रश्न करणारे आणि वडीलजन,
३
पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी, सल्लागार, कुशल कारागीर आणि धूर्त मांत्रिक या सर्वांसहित अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा ते काढून घेणार आहेत.
४
“मी किशोर मुलांना त्यांचा अधिकारी बनवेन; बालके त्यांच्यावर राज्य करतील.”
५
लोक एकमेकांवर अत्याचार करतील— पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी. तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील, मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील.
६
एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात, आपल्या भावास धरून म्हणेल, “भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो; या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!”
७
पण त्या दिवशी तो ओरडेल, “माझ्याकडे त्याचा इलाज नाही. माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत; मला लोकांचा पुढारी बनवू नका.”
८
यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.
९
त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; ते लपवित नाहीत. त्यांचा धिक्कार असो! त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.
१०
परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल. त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल.
११
दुष्टांचा धिक्कार असो! अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! त्यांनी केलेल्या कृत्याचा, त्यांना मोबदला मिळणार.
१२
तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात, स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात; ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात.
Settings