यशायाह ११:१-९
१
इशायाच्या बुंध्यापासून एक अंकुर निघून वर येईल; त्याच्या मुळांपासून एक फांदी येऊन ती फळ देईल.
२
याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—
३
आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील. ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत, किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.
४
परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.
५
धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल आणि विश्वासूपणा त्यांचा कंबरपट्टा असेल.
६
लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.
७
गाई अस्वलाबरोबर चरतील, त्यांची पिल्ले एकत्र झोपतील, आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.
८
लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल.
९
माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी ते कोणाचेही नुकसान किंवा नाश करणार नाहीत, कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या ज्ञानाने भरून जाईल.
Settings