एज्रा ४:६-१६
६
नंतर जेव्हा अहश्वेरोश राजाची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी त्याला यहूदीया व यरुशलेमच्या लोकांविरुद्ध आरोप करणारी काही पत्रे पाठविली.
७
राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीतही त्यांनी असेच केले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबील आणि त्यांचे साथीदार यांनी पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत व अरामी लिपीत पत्र पाठविले.
८
राज्यपाल रहूम, शिमशय लेखक यांनी यरुशलेमविरुद्ध पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत असे पत्र लिहिले:
९
राज्यपाल रहूम, शिमशय लेखक, तसेच अनेक न्यायाधीश, स्थानिक पुढारी आणि पर्शियाचे, बाबेलच्या येरेक आणि सुसा येथील एलामी लोक त्यात सामील होते.
१०
तसेच इतर अनेक राष्ट्रांचे लोकही या पत्राच्या लेखनात गोवलेले होते. त्यांना महान आणि थोर आसनपर ने त्यांच्या स्वतःच्या देशातून काढून पुन्हा यरुशलेमात, शोमरोनात व फरात नदीच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशांमध्ये वसविले होते.
११
अर्तहशश्त राजास त्यांनी पाठविलेल्या पत्रात असा मजकूर होता: अर्तहशश्त महाराज, फरात नदीच्या पश्चिमेला राहणार्या आपल्या विश्वासू प्रजाजनांकडून आपणास शुभेच्छा.
१२
कृपया राजास ही बाब विदित असावी की, बाबेलमधून यरुशलेमला पाठविलेले यहूदी लोक हे बंडखोर आणि दुष्ट शहर पुन्हा बांधत आहेत. ते या शहराचे कोट पुन्हा बांधत आहेत व मंदिराच्या पायाची दुरुस्तीही सुरू झाली आहे.
१३
परंतु हे शहर पुन्हा बांधले गेले, शहराचे कोट पुन्हा बांधले, तर त्यात महाराजांचे नुकसान आहे, कारण मग यहूदी लोक आपली खंडणी, नजराणे व कर भरण्यास नकार देतील.
१४
आमचे आश्रयदाते म्हणून आम्ही आपले ॠणी आहोत आणि महाराजांच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेऊन, आपली अप्रतिष्ठा व्हावी, हे आम्हाला बघण्याची इच्छा नाही. म्हणून आम्ही ही बातमी महाराजांस पत्र पाठवून कळवीत आहोत.
१५
आम्ही आपणास अशी विनंती करतो की आपण या शहराचा राजद्रोहाचा जुना इतिहास आपल्या पूर्वजांच्या जुन्या कागदपत्रात शोधून पाहावा, म्हणजे हे नगर मागील काळात किती बंडखोर होते हे आपणास आढळून येईल. राजांच्या विरुद्ध आणि त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार्या राष्ट्रांविरुद्ध बंडाळी केल्यामुळेच या नगराचा नाश करण्यात आला होता.
१६
आता आम्ही असे जाहीर करू इच्छितो की जर हे नगर परत बांधले गेले आणि त्याची तटबंदी पूर्ण झाली, तर फरात नदीच्या पलीकडील काहीही प्रदेश महाराजांच्या ताब्यात राहणार नाही.
Settings