एस्तेरला संकटाची माहिती मिळते
४
एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले.
५
मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले.
६
तेव्हा हथाक मर्दखयाला भेटण्यास राजद्वारासमोरील शहराच्या चौकात गेला.
७
मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले.
८
मर्दखयाने त्याला शूशनमध्ये जाहीर करण्यात आलेली, सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याच्या राजाज्ञेची एक प्रतही दिली आणि ती प्रत एस्तेरला दाखवून त्यासंबंधी सर्वकाही सविस्तर कळविण्यासही सांगितले. तसेच एस्तेरला तिने राजाकडे जावे आणि तिच्या लोकांसाठी तिने राजाजवळ दयेसाठी रदबदली करावी आणि त्याला विनवणी करावी, अशा सूचनेचा निरोपही त्याने त्याच्याजवळ दिला.
९
मग हथाक परत आला व त्याने एस्तेरला मर्दखयाने सांगितलेला अहवाल दिला.
१०
एस्तेरने हथाकाला मर्दखयाकडे पुढील निरोप देऊन पाठविले,
११
“राजाच्या सर्व अधिकाऱ्यांना व शाही प्रांतातील लोकांना माहीत आहे की एखादी व्यक्ती, मग ती पुरुष असो वा स्त्री, राजाच्या आतील चौकात बोलाविल्यावाचून गेली, तर त्यांच्यासाठी एकच कायदा आहे: त्यांना प्राणदंड देण्यात यावा. पण जर राजाने आपला सोन्याचा राजदंड त्यांच्यापुढे केला तरच त्यांना जीवदान मिळते. आता तीस दिवस होऊन गेले आहे, पण राजाने मला आपल्याकडे बोलावलेले नाही.”
१२
तेव्हा एस्तेरचा हा निरोप मर्दखयाच्या कानी घालण्यात आला.
Settings