प्रेषित १७:१६-२१
१६
त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला.
१७
म्हणून तो सभागृहामध्ये यहूदी आणि परमेश्वराचे भय धरणारे गैरयहूदी या दोघांबरोबर चर्चा करण्यासाठी जाऊ लागला आणि दररोज सार्वजनिक चौकात जे येत होते त्या सर्वांशी वादविवाद करू लागला.
१८
तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता.
१९
नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर चर्चेसाठी बैठकीत आणले व ते त्याला म्हणाले, “तू हे जे नवीन शिक्षण देत आहेस, ते काय आहे, हे आम्हाला समजेल का?
२०
कारण तू आम्हाला अपरिचित असलेल्या गोष्टी ऐकवीत आहेस व त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.”
२१
सर्व ॲथेन्सचे नागरिक व तिथे राहणारे परदेशी लोक, इतर काहीही न करता नव्या गोष्टी सांगणे किंवा ऐकणे यामध्ये आपला वेळ घालवित असत.
Settings