2 शमुवेल १०:१-१४
१
कालांतराने, अम्मोन्यांचा राजा मरण पावल्यानंतर, त्याचा पुत्र हानून राजा झाला.
२
तेव्हा दावीदाने विचार केला, “जशी त्याचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी त्याचा पुत्र हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाची माणसे अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,
३
तेव्हा अम्मोनी अधिकार्यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”
४
तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येक मनुष्याच्या अर्ध्या दाढीचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.
५
जेव्हा दावीदाला याबाबतीत सांगितले गेले, तेव्हा दावीदाने त्या माणसांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”
६
जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा त्यांनी बेथ-रहोब व अराम-झोबाह येथून वीस हजार अरामी पायदळ, तसेच माकाहच्या राजाबरोबर एक हजार लोक आणि तोब कडून बारा हजार माणसे भाड्याने आणली.
७
हे ऐकून, दावीदाने युद्ध करणाऱ्या माणसांच्या संपूर्ण सैन्यासह योआबाला पाठवले.
८
तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगरवेशीच्या दरवाजाजवळ येऊन थांबले आणि अराम-झोबाह आणि रहोबचे अरामी आणि तोब आणि माकाहची माणसे मोकळ्या प्रदेशात एकटीच होती.
९
शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले.
१०
बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले.
११
योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करण्यास यावे; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन.
१२
खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”
१३
तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले पण ते त्याच्यापुढून पळून गेले.
१४
जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा ते अबीशाईपुढून पळून शहरात गेले. तेव्हा योआब अम्मोनी सैन्याबरोबर युद्ध करून यरुशलेमास आला.
Settings