Skip to content
1 शमुवेल १:१-१०

1 शमुवेल १:१-१०

एफ्राईम येथील डोंगराळ भागात रामाथाईम-सोफीम या गावात एलकानाह नामक एक मनुष्य राहत होता, जो यरोहामचा पुत्र होता, तो एलीहूचा पुत्र, तो तोहूचा पुत्र, तो सूफाचा पुत्र, तो एफ्राईम गोत्रातील होता.
त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते.
दरवर्षी हा मनुष्य त्याच्या नगरापासून शिलोह येथे सर्वसमर्थ याहवेहची उपासना आणि यज्ञ करण्यासाठी जात असे, जिथे एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे याहवेहचे याजक होते.
यज्ञ करण्यासाठी जेव्हा एलकानाहचा दिवस येत असे, तेव्हा तो आपली पत्नी पनिन्नाह आणि तिच्या सर्व मुलांना आणि मुलींना मांसाचा वाटा देत असे.
परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते.
कारण याहवेहने हन्नाहचे उदर बंद केले होते, यामुळे तिची सवत तिला चिडवून त्रास देत असे.
वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. जेव्हा हन्नाह याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा तिची सवत पनिन्नाह, ती रडेपर्यंत चिडवीत असे आणि मग ती काही खात नसे.
तिचा पती एलकानाह तिला म्हणत असे, “हन्नाह तू का रडत आहेस? तू काही का खात नाहीस? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”
एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता.
१०
तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options