Feast of Trumpets बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत.
या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ”
“ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे.
याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत.
गोर्ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश;
आणि सात कोकर्यातील प्रत्येकासाठी एफाचा एक दशांश.
तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बोकड अर्पावा.
मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.
तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एज्रा याजक मोशेचे नियमशास्त्र घेऊन बाहेर आला. ते कळण्यास समर्थ असलेले सर्व स्त्री-पुरुष सभेत एकत्र जमा झाले.
मग राज्यपाल नहेम्याह, एज्रा याजक व शास्त्राचा शिक्षक व लोकांना शिकविणारे लेवी सर्व लोकांना म्हणाले, “याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने आजचा दिवस पवित्र आहे. तुम्ही विलाप करू नये वा रडू नये.” कारण लोक नियमशास्त्रातील वचने ऐकत असताना सर्वजण रडत होते.
नहेम्याह म्हणाला, “जा आणि मिष्टान्ने खा व गोड रस प्या व ज्यांनी काहीही बनविले नाही अशांनाही ते पाठवा. आजचा दिवस प्रभूप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही दुःखी असू नये, कारण याहवेहचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे.”
लेव्यांनी लोकांना शांत केले. ते म्हणाले, “तुम्ही शांत राहा, कारण हा पवित्र दिवस आहे. दुःख करू नका.”
म्हणून लोक मिष्टान्ने करून खाण्या-पिण्यासाठी आणि ताटे वाढून पाठविण्यासाठी गेले. तो दिवस मोठ्या आनंदाने उत्सव करण्याचा होता, कारण त्यांना देण्यात आलेले वचन आता त्यांना समजले होते.