Skip to content

स्तोत्रसंहिता ६

दया व न्यायाच्या शिक्षेपासून सुटकेसाठी विनंती १–३

१
संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.
२
मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.
३
माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?

स्तुतीसाठी जीवनाची आवश्यकता ४–५

४
याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा.
५
मृतलोकात तुमचे स्मरण नाही; गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार?

शत्रूंमुळे आलेला थकवा व शोक ६–७

६
माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.
७
दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे.

देवाच्या उत्तरावरील विश्वास ८–१०

८
दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.
९
याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.
१०
माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.