Skip to content

उपदेशक६

न उपभोगलेल्या संपत्तीची व्यर्थता

१
सूर्याखाली आढळणारी आणखी एक वाईट गोष्ट मला दिसली, जी मानवावर अतिशय भारी आहे:
२
परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे.
३
एखाद्या व्यक्तीला शंभर लेकरे असतील आणि तो दीर्घायुषी जगला; तरी तो आपल्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकत नसेल आणि त्याला योग्य रीतीने मूठमाती मिळत नाही, तर मी असे म्हणतो की, त्याच्यापेक्षा मृत जन्मलेला गर्भ बरा.
४
ते बाळ व्यर्थच जन्मते आणि अंधारात विलीन होते आणि अंधारातच त्याचे नाव नाहीसे होऊन जाते.
५
जरी त्याने न कधी सूर्याला बघितले ना त्याविषयी काही जाणले, त्या मनुष्यापेक्षा त्याला अधिक विसावा आहे.
६
जरी तो हजार किंवा दोन हजार वर्षे जगला व त्याला संपत्तीसुखाचा आनंद लाभला नाही. सर्वजण एकाच ठिकाणी जात नाही काय?

अतृप्त इच्छेची निष्फळता

७
प्रत्येक मनुष्य आपल्या पोटासाठी कष्ट करतो, परंतु त्यांची भूक कधीही तृप्त होत नाही.
८
शहाण्या लोकांना मूर्ख लोकांपेक्षा काय फायदा? दुसर्‍या लोकांसमोर कसे वागावे हे जाणून गरिबांना काय फायदा?
९
ज्यागोष्टी निरर्थक वार्‍याचा पाठलाग करण्यासारख्या आहेत, वासनेमागे धावण्यापेक्षा, आपल्या दृष्टीसमोर आहे, त्यात संतुष्ट असणे बरे.

मानवी मर्यादा व अज्ञान

१०
जे काही अस्तित्वात आहेत त्याला आधी नाव दिलेले आहे, आणि मानवता तर ओळखीची होती; कोणीही जो आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही.
११
जेवढे जास्त शब्द तेवढा अर्थ कमी होतो, मग उगाच बोलण्याने मनुष्यास काय लाभ?
१२
वायफळ सावलीसारख्या अल्पकाळच्या जीवनात उत्तम काय आहे हे कोणा मनुष्याला सांगता येईल काय? मेल्यानंतर सूर्याच्या खाली काय होईल, हे कोणाला सांगता येईल?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options