सैतान पृथ्वीवर फेकला जातो
७
मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराविरूद्ध लढले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याच्या दूतांनी युद्ध केले.
८
पुरेसे सामर्थ्य नसल्यामुळे युद्धात त्यांचा पराजय झाला आणि ते स्वर्गातील त्यांचे स्थान हरवून बसले.
९
तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले.
१०
तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “परमेश्वराचे तारण, सामर्थ्य व त्यांचे राज्य आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे; कारण आमच्या बंधुजनावर आरोप ठेवणार्याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे. तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे!
११
पण आमच्या बंधुजनांनी कोकराच्या रक्ताने आणि आपल्या साक्षीच्या वचनाने त्याचा पाडाव केला. स्वतःच्या जिवावर प्रेम न करता त्यांनी मरण सोसले.
१२
म्हणून अहो स्वर्गांनो व स्वर्गातील नागरिकांनो, उल्लास करा! पण पृथ्वी व समुद्रा तुम्हाला हाय, हाय! कारण आता आपल्यासाठी अगदीच थोडका काळ बाकी आहे, हे ओळखून सैतान अतिशय क्रोधाविष्ट होऊन तुमच्याकडे आला आहे.”
Settings