ज्ञानाचे आवाहन
२०
बाहेर उघडपणे सुज्ञान मोठ्याने आव्हान करते. भर चौकात ती तिचा आवाज उंचावते;
२१
भिंतीच्या उंचीवरून ती ओरडते शहराच्या वेशीजवळ ती भाषण करते:
२२
“अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार? कुचेष्टा करणारे तुम्ही कुचेष्टा करण्यात किती वेळ आनंद करणार आणि मूर्खांनो, किती काळ तुम्ही ज्ञानाचा द्वेष करणार?
२३
मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा! तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन, तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन.
२४
परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.
२५
कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,
२६
यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—
२७
जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.
२८
“तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,
२९
कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.
३०
ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,
३१
त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.
३२
कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल, आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल;
३३
परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.