Skip to content
गणना २०:१-१३

गणना २०:१-१३

पहिल्या महिन्यात सर्व इस्राएली लोकांचा समुदाय सीन अरण्यात आला आणि त्यांनी कादेश येथे तळ दिला. तिथे मिर्याम मरण पावली व तिला तिथेच पुरण्यात आले.
त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.
लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते!
याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय?
इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!”
मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले.
मग याहवेह मोशेला म्हणाले,
“आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.”
मोशेने आपली काठी याहवेहच्या उपस्थितीपुढून घेतली आणि जसे आज्ञापिले त्याप्रमाणेच त्याने केले.
१०
मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?”
११
मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले.
१२
परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”
१३
हे मरीबाहचे पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options