मार्क ७:२४-३१
२४
नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही.
२५
त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली.
२६
आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती.
२७
“प्रथम लेकरांना जेवढे पाहिजे तेवढे खाऊ द्या,” ते म्हणाले, “मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”
२८
“प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”
२९
येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.”
३०
ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता.
३१
सोर सोडून येशू सीदोन प्रांतामधून गेले आणि तिथून दकापलीस रस्त्याने ते पुन्हा गालील समुद्राकडे आले.
Settings