लूक ८:४०-५६
४०
जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते.
४१
इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली.
४२
कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती. येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले.
४३
आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते.
४४
तिने येशूंच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला.
४५
तेव्हा येशूंनी विचारले, “मला कोणी स्पर्श केला?” जेव्हा प्रत्येकाने ते नाकारले, पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोक तुमच्याभोवती गर्दी करून तुमच्याकडे रेटले जात आहेत.”
४६
परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.”
४७
मग आपण गुप्त राहिलो नाही, असे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणास्तव येशूंना स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांसमक्ष सांगितले.
४८
येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.”
४९
येशू अजून बोलतच होते तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घराकडून एक सेवक आला आणि म्हणाला, “तुमची कन्या मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”
५०
हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.”
५१
याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही.
५२
ते घर शोक करणार्या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.”
५३
तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते.
५४
मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!”
५५
त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.”
५६
तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.”
Settings