Skip to content
लूक ४:१६-३०

नासरेथमध्ये नकार

लूक ४:१६-३०
१६
ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले.
१७
यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:
१८
“परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.
१९
प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”
२०
नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती.
२१
येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.”
२२
सर्व लोक त्यांच्याबद्दल चांगले बोलले आणि कृपेची वचने त्यांच्या मुखातून बाहेर पडली हे ऐकून विस्मित झाले. ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र आहे ना?”
२३
येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मला ही म्हण लागू कराल: अरे ‘वैद्या, तू स्वतःलाच बरे कर!’ आणि तुम्ही मला म्हणाल, ‘ज्याकाही गोष्टी तुम्ही कफर्णहूम या गावात केल्या त्याविषयी आम्ही ऐकले आहे, त्या गोष्टी येथे स्वतःच्या गावात करा.’ ”
२४
“पण मी तुम्हाला निश्चित सांगतो,” ते पुढे म्हणाले, “संदेष्ट्याला स्वतःच्या गावी सन्मान मिळत नाही.
२५
हे मी खात्रीपूर्वक सांगतो, जेव्हा साडेतीन वर्षे आकाश बंद झाले व सर्व देशभर भयंकर दुष्काळ पडला होता, त्यावेळी इस्राएलमध्ये एलीयाहच्या काळात अनेक विधवा होत्या.
२६
तरीही एलीयाहला कोणाकडे पाठविले नाही, पण सीदोन प्रदेशातील सारफथ येथील विधवेकडे पाठविले.
२७
आणि त्याचप्रमाणे संदेष्टा अलीशाच्या काळात इस्राएलमध्ये अनेक कुष्ठरोगी होते पण त्यांच्यापैकी कोणी शुद्ध झाला नाही—केवळ सिरिया देशातील नामान.”
२८
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा सभागृहातील सर्व लोक संतप्त झाले.
२९
ते उठले, त्याला नगराबाहेर घालविले व ज्या टेकडीवर ते शहर वसले होते, त्या टेकडीच्या कड्यावरून ढकलून देण्यासाठी घेऊन आले.
३०
पण ते भरगर्दीतून चालतच त्यांच्या मार्गाने निघून गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options