विलापगीत १:१-७
१
एकेकाळी माणसांनी गजबजलेली ही नगरी, आता कशी निर्जन झाली आहे! एकेकाळी राष्ट्रांमध्ये जी सर्वोत्कृष्ट नगरी होती, तिला आता कसे वैधव्यच प्राप्त झाले आहे! एकेकाळची ही सर्व प्रांताची राणी आता कशी दासी झाली आहे.
२
रात्रभर ती अत्यंत रडत असते; तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. तिच्या सर्व प्रियकरात तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.
३
पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर यहूदाह बंदिवासात गेली आहे. ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते; आता तिला कुठेही आराम मिळत नाही. जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे.
४
सीयोनकडे जाणारे रस्ते विलाप करीत आहेत, निर्धारित सणाला तिच्याकडे कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, तिचे याजक कण्हत आहेत, तिच्या तरुणी शोकग्रस्त आहेत, आणि तिला अत्यंत पीडा होत आहे.
५
तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; तिचे शत्रू सुखात आहेत. याहवेहने तिला दुःख दिले आहे, कारण तिने अनेक पापे केली आहेत. तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत.
६
सीयोनकन्येचे सर्व वैभव लुप्त झाले आहे. तिचे राजपुत्र ज्यांना चरण्याकरिता कुरण उपलब्ध नाही अशा हरिणासारखे झाले आहेत; सामर्थ्यहीन होऊन ते त्यांच्या पाठलाग करणाऱ्यांपासून त्यांनी पलायन केले आहे.
७
यरुशलेमच्या या पीडित व भटकंतीमध्ये ती तिच्या समृद्धीचे स्मरण करते जे तिचे गतवैभवाचे दिवस होते. जेव्हा तिचे लोक शत्रूच्या हातात पडले, तिला साहाय्य करणारे कोणीही नव्हते. तिचे शत्रू तिच्याकडे बघतात, आणि तिच्या विध्वंसामुळे तिचा उपहास करतात.
Settings