यहोशुआ २:१-७
१
त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले.
२
तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
३
तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.”
४
परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते.
५
संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.”
६
परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्याखाली लपविले होते.
७
तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या.
Settings