Skip to content
इय्योब १:१-१२

इय्योब १:१-१२

ऊस नावाच्या देशात इय्योब नावाचा एक मनुष्य राहत होता. तो निर्दोष आणि सरळ; परमेश्वराचे भय धरणारा व पापापासून दूर राहणारा असा होता.
त्याला सात पुत्र व तीन कन्या होत्या,
त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता.
त्याचे पुत्र त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी मेजवानी देत असत, त्यावेळी ते आपल्या तीनही बहिणींना मेजवानीचे आमंत्रण देत असत.
या भोजनसमारंभाचा कालावधी आटोपल्यावर इय्योब त्यांच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करी. तो पहाटेस उठून त्या सर्वांकरिता होमार्पणाचा यज्ञ करी; कारण तो विचार करीत असे, “न जाणो माझ्या लेकरांनी पाप केले असेल आणि आपल्या अंतःकरणात परमेश्वराला शाप दिला असेल.” असा इय्योबाचा नित्यक्रम असे.
एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यासाठी आलेले असताना सैतानही त्यांच्याबरोबर आला.
याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आला आहेस?” सैतानाने उत्तर दिले, “पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे.”
तेव्हा याहवेहने सैतानाला विचारले, “माझा सेवक इय्योब याच्याकडे तू लक्ष दिलेस का? तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा व वाईटापासून दूर राहणारा आहे; अखिल पृथ्वीवर त्याच्यासारखा तुला कोणीही आढळणार नाही.”
सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “इय्योब परमेश्वराचे भय विनाकारण बाळगतो काय?
१०
आपण त्याचे घरदार व जे सर्वकाही त्याचे आहे त्याभोवती कुंपण घातलेले नाही का? तुम्ही त्याच्या हाताचे श्रम आशीर्वादित केले आहेत व देशात त्याचे कळप आणि गुरे वृद्धी पावत आहेत.
११
परंतु आता आपला हात पुढे करून जे सर्वकाही त्याचे आहे ते हिरावून घ्या आणि मग पाहा, आपल्या तोंडावर तो आपल्याला खचितच शाप देईल.”
१२
याहवेहने सैतानाला म्हटले, “ठीक आहे, मग सर्वकाही जे त्याचे आहे त्यावर तुला अधिकार दिला आहे, मात्र त्या मनुष्याला तू हात लावू नये.” तेव्हा सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options