याकोब ३:२-१०
२
आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे.
३
घोड्यांनी आज्ञा पाळावी म्हणून आम्ही त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याद्वारे संपूर्ण प्राण्याचे शरीर वळवू शकतो.
४
किंवा तारवांचे उदाहरण घ्या, ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वार्यांनी ती लोटली जातात, तरी चालकाची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने वळविता येतात.
५
त्याचप्रमाणे, जीभ ही शरीराचा लहान अवयव आहे, परंतु ती मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. विचार करा, मोठ्या जंगलाला पेटविण्यासाठी आगीची एक लहान ठिणगी पुरेशी आहे.
६
जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे.
७
सर्वप्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी वश झाले आहेत आणि त्यांना मनुष्यप्राण्याने वश केले आहे.
८
परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे.
९
या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो.
१०
याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये.
Settings